गाईड वापरण्यापूर्वी:

असे गाईड लिहिण्याची पद्धत नाही. चित्र पाहिल्यावर जी अनुभूति येते ती अनुभवण्यासाठी चित्र प्रदर्शन असते. या प्रदर्शनातिल चित्रांचे जेव्हा तुम्ही अवलोकन कराल आणि तुमच्या अनुभवांशी ताडून पहाल तेव्हा जे तुम्हाला कळेल ते महत्त्वाचे असते.

सोशल मीडियावर मी काही पोस्ट लिहिल्या होत्या आणि त्या वाचणाऱ्या वाचकांकडून मला हे गाइड लिहिण्याचा सल्ला दिला. वेळ कमी असल्याने सर्व सोपस्कार करून हे गाइड लिहायला वेळ नव्हता. तरी जसे लिहिले आहे तसे स्वीकार करा ही विनंती.

आधी चित्रांचे क्रमांक आहेत. त्यांचा क्रम प्रदर्शनात जसे बघाल तसे देण्याचा प्रयत्न आहे. नेहमीच ते जमले असे नाही.

12 आणि 40 माझी प्रायमरी शाळा

माझ्या शाळेची इमारत जुनी होती. वरती साधी कौले जुनाट उधई (termites) लागलेली लाकडे. त्याकाळी असलेला पिवळा रंग बाहेरून लावलेला. आत बहुतेक सफेदी (चुना) असावी. खिडक्या मोठ्या. आत बेंचेस होते का आम्ही सतरंजी वर बसायचो आठवत नाही. मला दोन्ही आठवतात म्हणजे कुठे असे नाही तर कुठे तसे असे असणार.

आमचे शिक्षक खादीचे कपडे, धोतर कुर्ता पण डोक्यावर टोपी नाही असे. वर्गात त्यांची विशिष्ट अशी छडी. ही त्रिकोणी आणि बाकदार होती. नंतर कळले की ही शिंदीची होती. त्याकाळचे शिक्षक तेव्हा चांगले मारायचे. आमचे शिक्षक मारकुटे मास्तर म्हणून प्रसिद्ध होते. ते स्वातंत्र्यलढ्यात सामील होते. एकदा गोळीबार झाला त्यावेळेस त्यांच्या कानाजवळून गोळी गेली होती. एकदा माझे गणित चुकले म्हणून डोक्यावर छडीने टपली मारली. मी जागेवर परत गेलो. नंतर त्यांच्या लक्षात आले की माझे बरोबर होते मग त्यांनी मला बोलावून डोक्यावर हात फिरवला होता.

पहिली दुसरीत आमचा अभ्यास बहुतेक दगडी पाटीवर व्हायचा. दगडी पाटी वर आम्हाला महाराष्ट्राचा जिल्हावर नकाशा कोरून आणायला सांगितले होते. तसा तो माझ्या आणि सगळ्यांच्या बाबांनी कोरून दिला होता. नंतर आम्ही दऊत टाक देखील वापरायला लागलो. दगडी पाटी कधीतरी फुटायची. शाळा माझ्या घरापासून साधारण सव्वा किलोमिटर वर असावी. आम्ही बहुतेक सर्वजण पायीच जायचो. शाळा सुटल्यावर ‘शाळा सुटली पाटी फुटली’ हे गाणे कधी कधी म्हणायचो. पाटी फुटली तरी ती वापरायला जमायची.

35 रात्रीचे आकाश 

उन्हाळा आला की रात्री सर्व बाहेर झोपायचे.  कोणी अंगणात खाटा मांडून आणि कुणी गच्चीवर.  दिवसाचे तापमान अगदी 115 डिग्री वर गेले तरीही.  त्याकाळी तापमान Fahrenheit मध्ये मोजायचे.  म्हणजे आकडा एकदम दमदार व्हायचा.  तापलेल्या गच्चीवर संध्याकाळी पाणी टाकले की रात्रीच्या वेळी थोडे थंड व्हायचे.  बरेचदा टाकले नाही तरी चालायचे. 

रात्री झोप येण्यापूर्वी चांगल्या गप्पा व्हायच्या.   वातावरण स्वच्छ होते. फारसे कुठे दिवे नसत.  त्यामुळे आकाश दर्शन खूपच चांगले व्हायचे.  गच्चीवर असलो तर जवळपास सर्व आकाश दिसायचे. त्यामुळे उन्हाळ्यातिल रात्रीचे आकाश बहुतेकांना पाठ व्हायचे.  ताऱ्यांची नावे माहिती नसली तरी.  कुणी माहीतगार असेल तर बरेच तारे कळायचे. चंद्र असण्यापेक्षा नसलेला बरा वाटायचा. 

रात्री आणि पहाटे बरेचदा खूप गार व्हायचे.  वारा चांगला असल्याने गारवा जास्त वाटायचा.  कित्येक जण जाड पांघरूणे घेऊन जायचे.  रात्री कधी कधी बारीकसा पाऊस पडायचा.  मग सगळे जण गाद्या गुंडाळून छपराखाली जायचे.  गच्चीवरून खाली जायचे. तेवढ्यात पाऊस थांबला तर परत येऊन झोपायचे. 

त्याकाळी डास नव्हते. हळू हळू लोकांनी कूलर वापरायला लागले. त्यातील पाण्याने डास वाढायला लागले. मच्छरदाणी गरजेची व्हायला लागली.  रात्रीचे स्वच्छ आकाश दिसेनासे झाले. त्याने वारा कमी शिरायचा आणि गरम व्हायचे. पाऊस पडल्यावर परतणे पण कठीण झाले.  लोक बाहेर झोपायचे थांबले. 

माझ्या आठवणीत मी भलामोठा धूमकेतू आकाशात पाहिला होता.  मला एका केरसुणी सारखा वक्राकार तो होता.  पण ही आठवण अंधुक होती.  माझे चित्र हे त्या आठवणीवर आधारित आहे. पण आता पहिले तर 1965 साली Ikeya–Seki नावाचा धूमकेतू येऊन गेला.   तो वक्राकार आणि अतिशय मोठा होता.  त्यावेळेस मी सहा वर्षाचा होतो.  आणि तो ऑक्टोबर मध्ये दिसायचा.  त्यामुळे रात्री गच्चीवर झोपलेले असणे दुरापास्त आहे.  आठवणी अशाच असतात.  

17 आणि 42 शिवाशिवी (tag)

शिवाशिवीचा खेळ जगभरच्या लहानमुलांमध्ये अतिशय प्रिय आहे. स्पर्श करणारा आणि स्पर्श टाळणारा यांची चढाओढ यात असते. वेगवेगळी बंधने टाकून त्यात वैविध्य साधले जाते.  लंगडी, झाडावरची, नदी की पहाड, डिपडीप, आईसपाइस, साखळी शिवाशिवी, आंधळी कोशिंबीर अशा अनेक प्रकारे तो खेळला जातो. यात विविध ठिकाणच्या मुलांमुळे त्यातले नियम बदलत राहतात. 

पंधरा पेक्षा जास्त मुले असली आणि मैदान मोठे असले की साखळी शिवाशिवी होते.  मला वाटते की हा खेळ 10-13 वर्षांची असेपर्यन्त हा खेळ आवडीने खेळला जातो.  एकाच वयाची मुले असायला हवी कारण नाहीतर साखळी तुटू शकते.  आमच्या शाळेत तो मधल्या सुटीत खेळला जायचा.  

आईसपाइस हा आय स्पाय या इंग्रजी शब्दातून आला आहे असे मी ऐकले.  पण त्यात डबा आणि शिवाशिवी सारखे पाहून आऊट होणे हे प्रकार बहुदा अस्सल भारतीय असावे.  यातील डब्यास, टमरेल प्रकारातला.  तुपाचे डबे बहुदा पाणी वाहून नेण्यास वापरले जायचे.  ते गळायला लागले की त्याचा पायाने ढकलुन उडवता यायचे.  तो होणारा आवाज ही या खेळातील विशेषतः होती.  

असे काही खेळ मोकळ्या मैदानात नाही तर घराच्या आसपास खेळले जायचे.  प्रत्येक ठिकाणी लपून राहण्याच्या खूप जागा असे.  कमी जास्त वयाची मुले चालायची.  

36 आणि 40 चूल आणि शेगडी  

आमच्या घरी मातीची चूल होती.  त्याची मला अंधुक आठवण आहे. माझ्या मोठ्या भावाला ती आठवते.   मला घरी गॅस आला त्याची आठवण आहे पण चुलीची नाही.  काही घरातील चुली मी त्यावेळेस पहिल्या आहेत आणि त्या आठवतात. चुली मातीच्या असायच्या.  

शेगडी मात्र आठवते. गॅस येऊन ही ती घरी असायची.  केरोसिनचे पंपाचे आणि वातीचे स्टोव असायचे.  त्यांचा वापर बरेच दिवस होता.  गॅस सिलिंडर संपला किंवा इतर अडचणीच्या वेळी त्यांचा वापर व्हायचा.  त्यावेळच्या मुलांना आग चांगली हाताळता यायची.  त्यामुळे शेगडीशी व्यवहार ते सहज करत असत.   स्टोवचे तसे नव्हते.  वातीचा स्टोव ज्योत शांत असल्याने आम्हाला वापरता यायचा. पण पंपाचा स्टोव धोकादायक असायचा. पिन मारणे हा वाक्प्रचार त्याची देणगी आहे. 

शेगडी आणि चूल इंधन संपत आले तरी जळत राहायच्या.  त्यावर दूध आटवण्यासारखी कामे व्हायची. संध्याकाळी थंडी पडली की शेगडीने ऊब यायची.  

8 30 21 33 आणि 15  कंचे, भोवरा, गिल्ली दंडा 

आमच्या मराठीवर हिंदीचा प्रभाव असल्याने गोट्या आणि विटी दांडू ही नावे आम्ही वापरत नसू.   या प्रत्येक खेळाचा काहीतरी कारणाने सीजन असायचा.  एकदा एक सुरू झाले की सगळीकडे ते तसेच खेळले जायचे.  यावर कुठल्याही वडीलधाऱ्यांचा सहभाग नसायचा.  हे नैसर्गिक पणे व्हायचे.  

कंचे विविध प्रकारचे असायचे.  पूर्ण निळे असलेले देखील असायचे.  तसेच छर्रे म्हणजे स्टीलचे पण असायचे.  त्यांना वेगवेगळी नावे असायची.  आम्ही खेळायचो आणि पश्चिम महाराष्ट्रात खेळल्या जाणाऱ्या गोटयांचे नियम वेगळे होते. विटी दांडू मात्र सर्वसाधारण सारख्या नियमात बसायचा.  बहुतेक खेळ दुसऱ्यास शिक्षा देणे या प्रकारात मोडतात.  भोवऱ्यात हरलेल्या मुलाच्या भोवऱ्याला गुच्ची नावाची शिक्षा होत असे.  त्यात त्याच्या भोवऱ्यास. भोवऱ्याच्या आरीने ठोकून खूण केली जायची. गुच्चीसाठी  नवीन भोवरा असला तर अधिक आनंद मिळायचा.  कंचे जुगारासारखे जिंकले जायचे. 

18 आणि 22 झाडावर चढणे

लहानसे तगरीचे झाड 5 वर्षांखालील मुलांसाठी चढायला उपयोगी व्हायचे. मग चाफ्याचे अशा पायऱ्या पायऱ्या ओलांडत पुढे जायची. बुंध्यापासून पहिली फांदी बारीकशी असली तरी पुरायचे. एकदा फांद्या सुरू झाल्या की फार अडचण नसे. काही झाडांना तसे नसायचे. आणि झाड आंब्यासारखे महत्त्वाचे असेल तर वेगवेगळ्या युक्त्या करावया लागायच्या. म्हणजे जवळ भिंत किंवा उंचसे दुसरे काही असेल तर त्यावर आधी चढून मग जायचे.

झाडाच्या फांद्या मजबूत असाव्या लागायच्या. शिवाय त्या किंवा त्यांना आलेल्या फांद्या हातात मावण्या एवढ्या हव्यात. काही झाडे एकदम ठिसुळ असायची म्हणजे एखादी मोठी फांदी थोड्याशा वजनाने तुटायची. अशी झाडे धोक्याची म्हणून ओळखली जायची.

पेरूचे झाड तेही उन्हाळा आणि हिवाळा या दोन ऋतुत चढण्यासाठी सगळ्यांना आवडायचे. कारण पेरू निरखून तोडायचे असायचे. तोडणारा त्याला आवडणारा पेरू तिथेच गट्ट करायचा. पण झाडाखाली देखील पेरू दाखवणारा कधी कधी गरजेचा असायचा. पेरूची फांदी मजबूत असायची हातात मावायची. त्यामुळे झाड चढण्यासाठी सोपे होते.

आबाधाबी, डाबडुबणी आणि सूरपारंब्या ही तीन नावे असलेले खेळ झाडावर खेळले जायचे. हे शिवाशिवीचे प्रकार होते.  यात प्रदेशात आणि झाडातील बदल असल्याने नियम अगदी वेगळे असू शकायचे.  

१६ ४७ कबड्डी आणि घुडसवारी 

कबड्डी सगळ्यांना माहीत आहे.   घुडसवारी मात्र नवीन असणार.   कबड्डीच्या धरपकडची धसमुसळेगिरी यात आहे.   हा खेळ पटकन संपतो.  एक मोठ्या मुलाच्या (घुड/घोडा) पाठीवर सवारी म्हणून छोटा मूलगा असतो. त्या मुलास पाठीवर घेतल्याने त्याचे दोन्ही हात त्यास धरण्यात जातात.  छोटा मुलगा त्याच्या गळ्याला एका हाताने कवटाळतो.  त्याचा एक हात रिकामा असतो.  

दुसऱ्या दोघांचेही तसेच असते. हे दोन घोडे आणि स्वार यांनी एकमेकाला भिडायचे आणि ज्याचा स्वार पडतो तो हरतो.  मोठी मुले एकमेकाला धक्के देतात. तर लहान मुले एका हाताने मारामारी करतात.  नखेही वापरतात. सर्वसाधारण पणे एखाद्या मिनिटात खेळ आटपंतो. 

कबड्डी हा माझ्या आवडीचा खेळ.  माझा दम जरा जास्त टिकायचा म्हणून परततो असे दाखवून शेवटचा हात किंवा टांग मारायची.  टांग पकडली तर स्वतःस थेट जमिनीवर झोकून द्यायचे आणि मध्य रेष गाठायची हे माझे तंत्र.  सुरुवातीस बरे होते पण नंतर सवय झाल्याने माझी पकड होऊ लागली आणि जवळपास त्यात माझे कबड्डी संपले. 

३४ ४८ सोंगट्या लगोरी 

आम्ही खेळत असलेले खेळ तसे खूप कमी खर्चाचे होते. क्रिकेटसाठी सहसा एक चेंडू, आणि उसने घेतलेली बॅट व स्टंप्स एवढेच पुरेसे असायचे. त्या काळी चेंडूने खेळले जाणारे सर्वच खेळ तसे महागडे असायचे.  लगोरी खेळासाठी खापरे वापरली जायचे. खापरे म्हणजे मातीच्या कौलांचे किंवा माठाचे तुकडे,  हे वापरल्याने लगोरी उभारण्यात अधिक अडचणी यायच्या आणि अधिक मजा. 

‘सोंगट्या’ हा असाच एक खेळ होता. हा खेळ नेहमी जमिनीवर बसून खेळला जाई. यासाठी फाशांची गरज असे. फासे म्हणून सहसा कवड्या वापरल्या जात, पण चिंचेच्या बियांचे दोन भाग करूनही फाशांसारखा त्यांचा वापर केला जाई.

हे खेळ अतिशय रोमांचक असत आणि कधीकधी त्यांचा शेवट भांडणातही होई. बहुतांश वाद गटांतर्गतच मिटवले जात. पण तसे न झाल्यास, भांडणाऱ्या पक्षांमध्ये काही काळासाठी दुरावा निर्माण होई.

मुले ही उत्तम शोधक असतात. एखाद्या खेळाचे नियम आणि स्वरूप बदलण्याची क्षमता त्यांच्यात असते. आजही मुले तशीच आहेत. पण मोठ्यांचे काय?

२६ ११ कल्हई पंक्चर 

खुपशा वस्तु रस्त्यावरचे फेरीवाले विकायचे.  बांगड्यासारखे कमीवेळा लागणाऱ्या वस्तु देखिल रस्त्यावरहे फेरीवाले विकायचे.  बरण्यात दूध भरून गवळी यायचे.  खेळणीवाले, फुटाणे, मुरमुरे, धार लावणारे इत्यादि अनेक रस्त्यावरून ओरडत जायचे. प्रत्येकजण विशिष्ट तालासुरात ओरडायचे. शब्द कळले नाही तरी कोण आला आहे हे कळायचे.  कल्हईवाला त्यातलाच. एका पोतडीत थोडे कोळसे, एक चामड्याची हवा भरायची पिशवी, काही हत्यारे, कापसाचे बोळे, एक पावडर आणि टिनाचे एक वाटोळे. 

एखाद्या घरात बोलावले की शेजारच्या पाचदहा घरांना कळायचे. काम सुरू करताना तो जमिनीत एक खड्डा करायचा त्यात कोळसे घालायचा, फुंकणीचा पाइप तो जमिनीत पुरायचा आणि त्याला चामड्याची पिशवी लावायचा. त्यामुळे तो हवा फुलवून अगदी गरम विस्तव करायचा.  ज्यात भांडी तापवायची त्यात पावडर टाकून पांढरा धूर करायचा.  मग त्यास टिन लावून, कापसाने पसरवयाचा.  कल्हई करताना बघणे नेहमी मनोरंजक असे.  

रस्त्यावरचा पंक्चरवाल्याचे (पंचर) काम देखील मनोरंजक असायचे.   यात किती आणि कुठे पंक्चर झाले आहे हे आधी शोधायचे. आणि त्यास विशिष्ट रबराचे तुकडे लावून त्यास बंद करायचे. हे विशिष्ट रबर गरम झाल्यावर वितळायचे आणि पक्के बसायचे. मग काम व्यवस्थित झाले की नाही हे परत पाण्यात घालून तपासायचे. 

बहुतेक जण आपल्या विश्वासू नेहमीच्या दुकानात जायचे. काही पंक्चरवाले विरळ ठिकाणी बसायचे. आपला धंदा वाढवावा म्हणून रस्त्यावर एखादी बाटली फोडून ठेवायचे. तेव्हा अशा वेळी सायकल सांभाळून चालवायला लागायची.   रस्त्यावर कुठलेही छप्पर नसणारे हे पंक्चरवाले साधारण दोन तीनशे मिटरवर नक्की सापडायचे.   

२३ १३ प्रार्थना, शिक्षा 

माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शाळेत, रोजची प्रार्थना व्हायची. आमचे गायनशिक्षक पेटीवर सूर वाजवून गाणे म्हणायचे.  सगळे जण हात जोडून प्रार्थना म्हणायचे.  मुलेच असल्याने यात वात्रटपणा  व्हायचा.  जो वात्रटपणा करायचा त्याऐवजी ज्याच्याशी केला त्याची हालचाल जास्त व्हायची.  कोणी प्रार्थनेचे विडंबन करायचा.  ‘अनंता अंत नको पाहू’ असे म्हणताना समोर अनंत असेल तर त्याच्या कानात मोठ्या आवाजात अनंता म्हणायचे इत्यादि. हलणाऱ्या मुलांवर सापडला तर थोबाडीत खायची वेळ यायची.  कुठलीही मुले कुठल्याही मुलाच्या घरी ती बातमी सांगायचे नाही.  मुले सगळ्यात घाबरायची ते घरच्यांना शाळेतल्या शिक्षा कळल्याचे.  शिक्षेने अपमानित होणे फारसे नसायचे.   

प्रार्थना झाल्यावर कुठल्या तरी वर्गातील मुले सुविचार सांगायची. प्रत्येक शिक्षकास कुठले तरी टोपण (सीक्रेट) नाव असायचे. ते नाव गुंतवून सुविचार सांगितला की मोठा हशा पिकायचा.  मास्तर दुर्लक्ष केल्यासारखे करायचे.   याला शिक्षा नसायची. माझ्या प्राथमिक शाळेतल्या मास्तरांपेक्षा हे सौम्य असल्याने मला त्याचे फारसे वाटायचे नाही. 

वर्गातही तसाच वात्रटपणा आणि तशाच शिक्षा असायच्या. शिक्षकानुसार कमी जास्त एवढेच.   

१० बंब 

‘बंब’ म्हणजे लाकूड किंवा कोळशावर चालणारा पाण्याचा बॉयलर. आज हा शब्द ‘बंबखाना’ या संदर्भातच प्रामुख्याने ऐकायला मिळतो. माझ्या बालपणीच्या घरात आणि परिसरात, ‘बंब’ म्हणजे अंघोळीसाठी व कपडे धुण्यासाठी पाणी गरम करण्याचे एक छोटे साधन होते. लहानपणी मी स्वतः त्यात आग पेटवायचो. त्यासाठी नारळाच्या शेंड्या, कोळसा, शेणाच्या गोवऱ्या इत्यादि घालून, बंबाच्या खालच्या जाळीची तयारी करावी लागे. त्यानंतर त्यावर कांडी कोळसा  आणि लाकडे रचली जात. अधूनमधून कराव्या लागणाऱ्या घरगुती कामांपैकी हे काम मला खूप आवडायचे.

मी कॉलेजमध्ये गेल्यावर घरी वीजेचा  वापर सुरू झाला. आजच्या काळात त्या जुन्या पद्धतीकडे पाहताना ‘कार्बन फूटप्रिंट’ (कार्बन उत्सर्जन) आणि पाणी गरम करण्याची अकार्यक्षम पद्धत असे मुद्दे समोर येतात. त्या बंबांना कोणतेही इन्सुलेशन किंवा धूर रोखणारी यंत्रणा नसायची. तरीही, ती आग पेटवण्याच्या आणि पाणी गरम करण्याच्या प्रक्रियेत घ्याव्या लागणाऱ्या मेहनतीमुळे आम्ही पाण्याचा वापर जपून करायचो. आजच्या काळात पाण्याचा जो अफाट वापर होतो, त्या तुलनेत जुन्या पद्धतीचा कार्बन फूटप्रिंटचा हिशोब कसा असेल?

३२, ३८  पेटी, हॉल्डॉल 

शाळेत नेण्यासाठी पत्र्याची पेटी करावी असे कुणाच्या डोक्यात आले माहीत नाही. एकदा आल्यावर टिकाऊ आणि वह्या पुस्तके जपणारी वस्तु म्हणून तिचा वापर होऊ लागला.   त्याकाळी प्रवास करताना जडजुड  पत्र्याची पेटी वापरायचे.  शाळेतली  पत्र्याची पेटी मात्र ऍल्युमिनियमची होती.  शाळेत चालत जाताना ती पायावर घासली जायची आणि पाय काळे व्हायचे.  म्हणजे त्यात शिसे असावे असा अंदाज. 

होल्डऑल हे त्याकाळचे वळकटीला दिलेले नाव. फक्त हे चांगले कॅनवस मध्ये शिवलेले असायचे. त्यात कप्पे असून बांधायला दोन चामड्याचे पट्टे  आणि त्यांच्या मध्ये अजून एक पट्टा ज्यास धरून ते उचलता यायचे.  प्रवासात वळकटीसारखे पसरून झोपता यायचे.  फक्त ते खूप आखूड असायचे.  फिरकीचा तांब्या ही त्यावेळची वॉटरबॉटल.  प्रवासात सहसा तो अल्युमिनियमचा असे. 

 ३३ प्रयोग 

रसायनशास्त्रातील प्रयोग विशेषतः वायु उत्सर्जनाचे आणि रंगीत क्रीस्टल तयार करणारे खूप प्रेक्षणीय असत.  मग जमवाजमव  करून कुठेतरी मोठ्यांच्या नजरेआड हे करायचे.  काही मुलांना त्यांचे वडीलधारे मदत करायचे. 

४१ सर्कस 

सर्कस 10-11 वर्षांपर्यन्त खूप करमणूक करायची.  नंतर त्यात तोच तोचपणा यायला लागायचा.  वाघ सिंह समोर येऊन आगीच्या रिंगणातून उडी मारणे.  रिंगमास्टरने त्याचा चाबूक वाजवणे. जोकरने घाबरणे इत्यादि व्हायचे.  हा खेळ तिचे मुख्य आकर्षण असायचे. दुसरे आकर्षण झुल्यावरील कसरती.   मला वाटते सर्कशित पन्नासजण तरी काम करायचे.  तेच तंबू उभारायचे, कसरती करायचे, प्राण्यांची निगा राखायचे, सैपाक करायचे तिथेच झोपायचे. कंपनी कुठलीही असली तरी फारसा फरक नसायचा.  मृत्यूगोल, चाकू फेक, तोफेच्या तोंडी देणे असे कमी वेळेचे प्रकार असायचे.  कित्येक वर्षांनी माझ्या भावाच्या आग्रहाखातर मी परत पाहिली.  तोच तंबू पण बाकी सारे बिचारे. कदाचित ती शेवटची सर्कस असावी.  यावेळेस मी फोटो न काढता तिच्या तंबूचे प्रेक्षागृहाचे स्केच केले आणि ते वापरले.    

४३ मुलींचे खेळ आणि कामे 

शाळा जरी को-एड असली तरी मुलामुलींमध्ये सोशल डिस्टन्स असायचे. प्रायमरीशाळेत ते तसे नसायचे.  तशीच मुलांचे आणि मुलींचे खेळ देखील वेगळे असायचे.  मुली दोरीवरच्या उड्या गाणी म्हणत म्हणायच्या, सागरगोटे, टिक्कर बिल्ला खेळायच्या. लगोरीसारखे खेळ एकत्र होऊ शकायचे.   घरातले पत्ते, सोंगट्या इत्यादि मध्ये  लिंगभेद नसायचा.   तेव्हा रोजचे जात्यावर दळणे, कांडणे नसायचे. कपडे धुवायला मोलकरीण असायची.  सडा उन्हाळ्यात लागायचा.  आणि घालणारे मुले, पुरुष पण असायचे.  

२० हॉस्टल रूम 

ती फक्त ८० चौरस फुटांची होती. एक पलंग, एक टेबल, एक खुर्ची, एक बल्ब, एक कपाट. पण ती माझी होती. ती कधीच कोणासोबत शेअर केली गेली नाही. मी पदवीच्या जवळ पोहोचत असताना, खोलीत एक छताचा पंखा लावण्यात आला. आम्ही पदवीधर होत असताना, खोलीची परिस्थिती थोडी अधिकच बिकट झाली. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी काही महिन्यांसाठी ती ८० चौरस फुटांची जागा शेअर करू लागले. परिस्थिती आणखीच बिघडत गेली, आणि आज जवळजवळ सर्व पदवीचे विद्यार्थी एकत्र राहतात.

त्या काळात, माझे १५ शेजारी होते, ज्यांना मी ‘विंगमेट्स’ म्हणायचो. इतर वसतिगृहातील विद्यार्थ्यांपेक्षा विंगमेट्स एकमेकांना मदत करायचे, एकमेकांना आधार द्यायचे आणि जास्त बोलायचे. सुट्ट्यांमध्ये आम्ही घरी जायचो. आम्ही घरचा खाऊ  घेऊन यायचो. साहजिकच, विंगमेट्स ते वाटून खायचे. त्या गप्पांनी भरलेल्या संध्याकाळ असायच्या.

अन्यथा, आम्ही एकत्र जमायचो. पण खाणे वाटून खाण्याच्या वेळी सर्वात जास्त गर्दी जमायची.

२  २४  ५  लाउंज वॉलीबॉल पोहणे 

मी शाळेपासून वॉलीबॉल खेळायचो बहुतेक डायरेक्ट पद्धतीने.  ऊंची तेवढी नसल्याने शॉट मारणे कधी जमले नाही.  कॉलेजमध्ये ही खेळायचो.   परत डायरेक्ट पद्धत नेट जवळून जाणारे शॉट.  पुढे काही शॉट मारणारी मुले आली त्यामुळे शॉट घेणे, पास करणे हे वाढले. 

साधारण 250 मुलांच्या वसतिगृहासाठी आरामात बसून रोजचे पेपर, मासिके वाचणे यासाठी एक लाउंज होते.  10-12 जण आरामात बसून ते करू शकायचे आणि ते पुरायचे.  तिथेच कॅरम होता, तिथे कधी कधी तासन्तास जायचे.  

मी खूप ठिकाणी पोहलो आहे. पण नैसर्गिक तलावातील पोहण्याचा मी सगळ्यात जास्त आनंद घेतला.  तिथले शांत आणि अथांग पाणी मला नेहमीच आवडायचे. 

६ १६ एमएम सिनेमा, छायागीत 

प्रत्येक वर्षी प्रत्येक वसतिगृहात साधारण तीनदा 16 एम् एम्  सिनेमे दाखवले जायचे.   गणेशोत्सव आणि इतर ठिकाणी घराच्या परिसरात ते दाखवले जायचे. बहुदा तेच तेच असायचे. इथे मात्र मुलांच्या पसंतीचे असायचे.  शम्मी कपुर, मधुबाला इत्यादि त्यातले लोकप्रिय चेहरे होते.  कधी कधी वन्समोर व्हायचे.   

छायागीत मात्र दर आठवड्याला कृष्णधवल टीव्ही वर व्हायचे.  कमी वेळाचे असल्याने अर्ध्याहून जास्त बघायचे. एवढी जागा नसायची म्हणून दाटीवाटीने बसून उभे राहून बघितले जायचे.  

२ ब्रेकफास्ट 

ब्रेकफास्टचा मेनू ठरलेला असायचा. टोस्ट, अंड्याचा काही प्रकार किंवा दूध आणि चहा.   रोजचे असून तो न आवडणारा सहसा कोणी नव्हता.  आमच्या काळी प्रत्येक आठवड्याला जवळपास सगळ्यांना दोन परिक्षा द्याव्या लागायच्या त्या देखील दिवसाच्या सुरुवातीस म्हणजे ८.३० वाजता व्हायच्या.  त्यामुळे ब्रेकफास्ट असताना निम्या जणांना परिक्षा असे.  ज्यांना असे ते शेवटच्या वेळी त्यांचा अभ्यास किंवा एकमेकात चर्चा चाले. कठीण पेपर काढणाऱ्या शिक्षकांचे असले की वातावरणात ताण असे.  काही जण रात्री उशिरा झोपल्याने उशिरा उठायचे, मग विंगमेटस् त्यांना वेळेत उठवायचे. 

१९ कॉरिडॉर 

आमच्या संस्थेत एक खूप लांब सरळसोट कॉरिडॉर होता.  आमच्या खोली समोर देखील एक चिंचोळा आणि लांब कॉरिडॉर होता. हॉस्टेल बहुदा गजबजले असायचे. पण उन्हाळी हिवाळी सुट्यांमध्ये ते तसे नसायचे.   उन्हाळी सुट्यामध्ये काही थोडे जण त्यांचे राहिलेले कौर्सेस पूर्ण करायचे. पण हिवाळ्यात तेही नसायचे. 

तेव्हा एकटे पण आले की खोली समोरच्या अरुंद भिंतीवर बसून एकटे पणात चिंतन मनन करायचे. 

२८ पंचींग रूम

सुरुवातीचे कम्प्युटर अजस्र असायचे.  आजच्या सारखे त्यास स्क्रीन नसायचे.  प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही पंच कार्ड वापरायचो.  प्रोग्राम लिहिण्यासाठी साधारण ६५-७० अक्षरे एका कार्डावर मिळायचे.  ती देखील हवी तेवढी नाही मिळायची.  सुरुवातीला एका कागदावर प्रोग्राम लिहून द्यायचा मग तिथले पंच ऑपरेटर ते कार्डावर आणायचे.  ते तपासून मग एका ट्रे मध्ये ठेवायचे. दुसऱ्या दिवशी त्याचे उत्तर मिळायचे.  काही चुका असल्या की त्या आउटपुट वरुन शोधायचे नंतर त्या सुधारून परत एक दिवस वाट पाहायची.  नंतर मी माझ्या कार्डांचे पंचींग करायलो लागलो. माझे प्रोग्राम मोठे झाल्याने आउटपुट दुसऱ्या नाही तर पाचव्या सहाव्या दिवशी मिळायचे. 

या सगळ्यामुळे आम्ही जास्त careful झालो.  लहान प्रोग्राम कसे करावे हे शिकलो.  त्यावेळेस पाचसहाशे कार्डांचा, अति हिशोब करणारा  प्रोग्राम झाल्यावर मी दक्षिण मुंबईच्या मोठ्या संस्थेत जाऊन काम करावे लागे. 

८  बंपस्    

एखाद्या मुलाला स्कॉलरशिप, नोकरी, बक्षीस असे काही मिळाले की त्याचे अभिनंदन करण्यासाठी मित्र मंडळी त्याचे हात पाय धरून आडवे हवेत उडवले जायचे.  असे दोन चार वेळा झाले की ते पूर्ण व्हायचे.  आता कळते की इंग्लंडमध्ये वाढदिवशी काहीजण असे करतात.

२५ १४ काँक्रीट गॅंग, डेपो काँक्रीट

८० आणि ९० च्या दशकात काँक्रीटच्या कामांवर काँक्रीटच्या  गॅंगचे  जवळजवळ राज्य होते. नावाप्रमाणे हे गुन्हेगारांचे गट नव्हते. ते मेहनती बांधकाम कामगारांचे गट होते. ते साहित्य हाताळण्यात तज्ञ होते, पण पारंपरिक अर्थाने अशिक्षित होते.

त्यांना फक्त एकाच कामासाठी कामावर ठेवले जात असे: काँक्रीटिंग. साहित्य वाहून नेण्यासाठी ते स्वतःच्या कंपन्या, घमेले, कॉम्पॅक्टिंग रॉड्स आणि लाकडी मचानांचा वापर करत. एका यांत्रिक काँक्रीट मिक्सरशिवाय, ते जवळजवळ कोणतेही यांत्रिक उपकरण वापरत नसत. मिक्सर बहुतेकदा भाड्याने घेतलेला असे. त्यांच्यात जबरदस्त समन्वय होता. त्यांच्या कामादरम्यान त्यांच्याशी बोलणे खूप कठीण होते. ते स्वतःच्या मिश्रणावर नियंत्रण ठेवत आणि अपेक्षित कार्यक्षमता साधत. शटरिंगचे अत्यंत कमी दर्जाचे निकष आणि काही ठिकाणी दाटीवाटीने लावलेल्या स्टीलमुळे, ते स्लरीची वाजवी हानी होऊ न देता काँक्रीटवर नियंत्रण ठेवू शकत होते. त्यांचे काँक्रीट कधीही घनफळाच्या प्रमाणाच्या मानकानुसार नसायचे. ते नेहमीच त्या काळी परवानगी असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त वाळू घालत असत.

आधुनिकता हळूहळू आली. डिझाइन केलेले काँक्रीट आले. जेव्हा जेव्हा मी मिश्रणांचा अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की तेही वाळू जास्त घालतात.  काँक्रीटचे काम करणाऱ्या टोळ्यांप्रमाणेच, डिझाइन केलेल्या मिश्रणांमध्ये बहुतेकदा जास्त वाळू टाकली जाते. 

४ २९ ड्रॉइंग ऑफिस आणि अमोनिया प्रिंटिंग 

१९८० च्या दशकातील स्ट्रक्चरल इंजिनिअरच्या कार्यालयात ड्रॉइंग काढण्यासाठी (ड्रॉइंगसाठी) एक स्वतंत्र विभाग असायचा. ड्रॉइंग बोर्ड्ससाठी मोठी जागा आणि उंच स्टूल्सची गरज भासे; तिथेच विविध चर्चाही होत असत. आराखडे काढताना ड्रॉइंग पेन्स आणि स्टेंसिल्सचा वापर केला जाई. काम सुरू असताना संपूर्ण आराखडा एकाच वेळी पाहता येत असे. अभियंते प्रामुख्याने कॅल्क्युलेटर आणि ‘स्लाईड रूल्स’च्या (slide rules) साहाय्याने काम करत असत.

सुरुवातीला आकडेमोडीसाठी आणि नंतर ड्रॉइंग  काढण्यासाठी संगणकाचा वापर सुरू झाला. संगणकाचे स्क्रीन  छोटे असत, त्यामुळे संपूर्ण आराखडा एका नजरेत पाहणे अशक्य होते. यामुळे वेळेची बचत झाली खरी, पण विषयाची सखोल समज काही प्रमाणात कमी झाली; परिणामी चुकांचे प्रमाण वाढले.

अमोनिया प्रिंटिंग भागात अमोनियाचा वास पसरलेला असायचा.  काम कटकटीचे होते. प्रिंट निळसर रंगात यायच्या.   तो भाग ऑफिसेसचा अविभाज्य भाग असायचा.   

प्रत्यक्ष हाताने काम केल्याने विषयाची समज अधिक चांगली विकसित होते. कदाचित याच गोष्टीमुळे मी चित्रकलेकडे वळलो असावे. चित्रकला ही पूर्णपणे हाताने करायची प्रक्रिया आहे. ही एक संथ प्रक्रिया आहे आणि त्यात मी पूर्णपणे तल्लीन होऊ शकतो.